Wednesday 24 August 2016

काही खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात.. मला ताजी, टवटवीत भाजी मिळाली की मनापासून आनंद होतो. भाजी घरी आणून त्याचं color combination लावून sorting करणे, निवडून ठेवणे इ. कामे मी मनापासून करते ( दरवेळी जमतंच असं नाही पण तसा प्रयत्न असतो). या सगळ्या सवयी आई ने लावल्या.. अगदी नकळत. छोट्या गावात लहानाचे मोठे झाल्याचे काही फायदे असतात त्यापैकी एक म्हणजे ताजी भाजी मिळणे. मिरजेत अजूनही मंगळवारचा, गुरुवारचा बाजार भरतो असा आई सांगते. नशीब तिथे star bazar , reliance fresh यांनी अजून बस्तान मांडले नाहीये..थेट शेतकऱ्याकडून भाजी घायचा आनंद काही वेगळाच असतो. आईचा कोबीवाला मामा, काकडी-वांगी विकणारी मावशी हे पण ठरलेले आहेत..आई त्यांच्याशी एकनिष्ठ आहे आणि ते आईशी ! इकडे बंगलोरला पाणी मारून आणि fancy lights लावून शिळी भाजी विकणारे malls पाहिलेकी नं चुकता मिरजेच्या आठवड्याचा बाजार डोळ्यापुढे येतो आणि तिथल्या ताज्या भाज्यांची आठवण येते.
शिळ्या भाजीतच आनंद मानायची सवय लागते आणि अचानक एक दिवस फ्रेश आणि टवटवीत भाजी मिळून जाते आणि असं काहीतरी लिहायला सुचतं.